लातूर : माहेरी असलेल्या पत्नीचा गळा चिरुन खून करुन पती फरार झाला आहे. लातुरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीशी जमत नसल्याने राहायला माहेरी असलेल्या महिलेचा तिच्याच पतीने निर्दयपणे गळा चिरुन खून केला. लातूरमधील अवंती नगरमधली ही घटना आहे.

मयत महिलेच्या वडिलांनी आपल्या मुलीला तिच्या पतीपासून धोका असल्याची फिर्याद एमआयडीसी अनेक वेळा देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मयताच्या वडिलांनी केलाय. वेळीच पोलिसांनी काही कारवाई केली असती तर आज माझ्या मुलीचा बळी गेला नसता म्हणत त्यांनी हंबरडा फोडलाय.

रेश्मा अबद्दुला शेख असं २० वर्षीय मयत महिलेचं नाव आहे. रेश्माचा निकाह लातूरमधील इस्लामपूरा चौकातील अब्दुल शेख यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र पतीसोबत पटत नसल्याने रेश्मा गत दोन अडीच महिन्यापासून आपल्या 2 वर्षीय चिमुकल्या मुलासह माहेरी अवंती नगरला राहत होती.

दरम्यान, पती सासरी येऊन रेश्माला त्रास द्यायचा. त्यामुळे रेश्माच्या वडिलांनी एमआयडीसी लातूर पोलिस ठाण्यात अनेक वेळा तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण एमआयडीसी लातूर पोलिसांनी रेशमाच्या पतीवर कसलीही कारवाई केली नाही. त्यामुळेच आज त्याचं मनोबल वाढलं आणि त्याने घरी येऊन रेश्माचा गळा धारदार लोखंडी चाकूने कापला आणि तेथून पसार झाला.

त्यावेळी रेश्माच्या बाजूला झोपलेल्या मुलाला जाग आली. रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेल्या आईला जाग येत नाही हे पाहून तो बाहेर रडत आला आणि पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आईने हंबरडा फोडला. शेजारी, नातेवाईक जमा झाले.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. सगळ्या अवंती नगरमधील वातावरण थरारुन गेलं. आता एमआयडीसी लातूर पोलिस घटनेचा तपास करत आहेत. पण पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर रेश्माला आपला जीव गमावण्याची वेळ आली नसती अशीही चर्चा आता होऊ लागलीय.

गेल्याच महिन्यात भर दुपारी विद्यार्थ्याची हत्या
लातूरमध्ये भर दिवसा कोयत्याने वार करून एका विद्यार्थ्याचा त्याच्याच मित्राने खून केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अवंती नगरमध्ये झालेल्या या थरारक खुनामुळे लातूरकर चांगलेच हादरले आहेत. शांत लातूर अशी ओळख असणाऱ्या लातूर शहर आणि जिल्ह्यात हे काय होतंय? असा केवळ प्रश्नच लातूरकरांना पडला नाही तर आता या घटनेनं लातूरकरांच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आलाय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here