धरणगाव तालुक्यातील कंडारी येथे राजू मानसिंग भिल आणि भारत सुकडू भिल या दोघांमध्ये ५० रुपयांच्या उधारीवरून सोमवारी रात्री आठ साडेआठ वाजेच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली. थोड्याच वेळात शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजूने काका भारत यांना जोराचा धक्का दिला.
या धक्क्यामुळे भारत हे जवळच्या गटारीत जाऊन पडले. गटारीत पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तस्त्राव झाला. यानंतर भेदरलेल्या पुतण्या राजूने त्यांना ताबोडतोब नातेवाईकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती भारत भिल यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृत्यूस कारणीभूत पुतण्या राजूविरुद्ध भादवि कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ हे करत आहे.