मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात गेल्या शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला होता. ‘तुझी आई आजारी आहे, तुला माहेरी सोडतो, अशी बतावणी करत महिलेचे दुचाकीवरून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात महिला दुचाकीवरून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाखरे साळवीवाडी येथील रस्त्यावर ही घटना घडली होती. मनीषा वारीसे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती. आपले दैनंदिन काम आटोपून ही महिला मंदिरात उत्सवासाठी गेली होती. मंदिरात दर्शन घेऊन ती परतत असताना गावातील संशयित दिगंबर याने महिलेला गाठलं. तुझी आई आजारी आहे, तुला माहेरी सोडतो अशी बतावणी त्याने केली आणि महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मिळाली आहे. पावस चावडीवाडी येथे तिचे माहेर असून, या ठिकाणी दुचाकी न थांबवता त्याने ती पुढे नेली. त्यावर महिलेला संशय आला. नाखरे साळवीवाडी इथे तिने दुचाकी थांबवण्यास सांगितले. त्यावेळी त्या दोघांमध्ये झटापट झाली आणि ती रस्त्यावर पडली. यात तिला गंभीर दुखापतही झाली. मात्र त्यावेळी तिला मदत न करता, हा सगळा बनाव उघड होईल, या भीतीने दिगंबरने तिला रस्त्याच्या कडेला ठेवले आणि तिथून तो पसार झाला. या दरम्यान मावळंगे येथील एक जण आपल्या कामगारांना घेऊन त्या रस्त्याने जात असताना त्यांना महिला रस्त्याच्या कडेला पडलेली दिसली. त्यांनी तात्काळ याची माहिती पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस तेथे पोहचले. जखमी महिलेचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
या सगळ्या प्रकाराची दखल थेट जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी घेतली. ४ फेब्रुवारी रोजी घटनास्थळी भेट देऊन सूचना देऊन तपास पथके तयार केली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, पूर्णगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली. त्यांनी केलेल्या तपासात संशयिताची माहिती मिळताच, अवघ्या काही तासांत संशयिताला अटक केली.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times