तत्पूर्वी संजय राऊत यांनी बुधवारी दिल्लीत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ईडीवर प्रचंड आगपाखड केली होती. मी उपराष्ट्रपतींना पाठवलेले पत्र हा ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. ईडी ही मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वरती आहे का? ईडीच्या माध्यमातून फेडरल सिस्टीमची वाट लावली जात आहे. इतके दिवस देशाचा प्रश्न आहे म्हणून मी गप्प बसलो होतो. पण ही मुंबई आहे आणि मुंबईतील दादा हा शिवसैनिकच आहे. आता तुम्ही पाहाच काय होतं. मी लवकरच शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहे. त्यानंतरची पत्रकारपरिषद मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर घेईन, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ईडीला या सगळ्याची किंमत मोजायला लागेल. मीदेखील याची किंमत मोजायला तयार आहे, अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता संजय राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांचे काही गैरप्रकार समोर आणणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
…तर तुम्हालाही जेलमध्ये पाठवू: राऊत
अनिल देशमुखांच्यासोबतच्या कोठडीत तुम्हाला पाठवू, अशी भाषा भाजपचे बिनबुडाचे नेते करत आहेत. आम्ही जाऊ. दादागिरी तुम्ही करताय. पण पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही खेचू. कारण तुमची पाप अधिक आहेत आणि आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाही तुम्हाला, असं राऊत पत्रकारपरिषदेत म्हणाले. पवार कुटुंबाच्या घरी ५ दिवस जाऊन हे ईडीचे अधिकारी बसले होते. ते सांगायचे या नेत्याचं नाव घ्या, त्या नेत्याचं नाव घ्या. हे पवार कुटुंबीयांच्या बाबतीत घडलं. हे आमच्या बाबतीत घडतंय. तुम्हाला काय वाटतंय आम्ही गुडघे टेकू, अजिबात नाही, असेही राऊत यांनी ठणकावून सांगितले.