मुंबई: राज्यातील महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी ‘ईडी’च्या माध्यमातून माझ्यावर दबाव आणला जात आहे. या सगळ्याला सहकार्य करण्यास नकार दिल्याने ‘ईडी’कडून माझे कुटुंबीय आणि नातेवाईकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला होता. संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना तसे पत्र पाठवले आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. हे सगळं कटकारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. ते ईडीच्या अधिकाऱ्यांना कोणावर आणि कशी कारवाई करायची, याबद्दल सूचना देत आहेत. महाविकासआघाडीच्या नेत्यांविरुद्ध ईडीकडून होणाऱ्या कारवाईची सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस हाताळत असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (NCP leader Nawab Malik reaction on Nawab Malik letter bomb)

राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे. आमच्या नेत्यांच्यामागेही चौकशीचा ससेमिरा लावत आहेत. भाजपला वाटतंय घाबरुन सरकारमधून बाहेर पडतील व सोबत येतील हा भाजपचा गैरसमज आहे, असेही नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले.
sanjay raut : संजय राऊत मुंबईत ‘बॉम्ब’ फोडणार! म्हणाले, ‘हे फक्त माहिती पत्र, पोलखोल होणार’
‘सत्ता परिवर्तन झाल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल’

ईडीच्या माध्यमातून भीती निर्माण करुन सत्ता काबीज करता येणार नाही. हे महाराष्ट्र आहे. पवारसाहेबांना नोटीस दिल्यानंतर तुमची काय परिस्थिती झाली होती हे राज्याने पाहिले होते त्यामुळे तुम्ही जितका केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सरकारला दाबण्याचा प्रयत्न करणार तितक्या ताकदीने महाराष्ट्राची जनता आमच्यासोबत राहील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

संजय राऊत यांनी लिहिलेली परिस्थिती सत्य आहे. या सगळ्या कारवायांना कुणीही घाबरणार नाही. ईडीचा अधिकारी राजेश्वर सिंग राजीनामा देतो आणि त्याला उत्तरप्रदेशमधून भाजप तिकिट देते याचा अर्थ ईडीचे अधिकारी भाजप कार्यकर्ते आहेत. सत्तेचा वापर करून हे करत आहात परंतु सत्ता गेल्यानंतर विरोधक जर असं वागले तर तुमची काय परिस्थिती होईल हे भाजपला आणि अधिकार्‍यांना कळलं पाहिजे. सत्ता काय अमर नसते. सत्ता परिवर्तन झाल्यावर त्याचे उत्तर अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकार्‍यांनी कायद्याने काम करावे भाजप कार्यकर्ता म्हणून काम करु नये असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

केंद्रातील सत्ताही ताब्यात घेऊ: नवाब मलिक

देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे. परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ, असा आक्रमक इशाराही नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला. महाविकास आघाडीचे सरकार २५ वर्ष टिकणार आहे. अधिकार्‍यांचा वापर करून बातम्या पेरायच्या. लोकांना बदनाम करायचे. नोटीसा पाठवायच्या हा सगळा उद्योग केंद्रीय यंत्रणांनी बंद करावा. हे जास्त दिवस चालणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मलाही धमक्या दिल्या जात आहेत. मी काही भित्रा नाही. भाजपला कितीही काही करु द्या मी शेवटपर्यंत लढणार आहे अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here