शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप त्यात केला आहे. राऊत यांच्या पत्रानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी पत्रात अनेक दावे आणि आरोप केले आहेत. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतानाही त्यांनी केंद्रातील सरकार आणि महाराष्ट्र भाजपवर आरोप केले आहेत. तसेच आम्ही घाबरणार नाही, असा ठणकावून सांगितलं. यानंतर भाजपने राऊत यांच्यावर ‘नेम’ साधला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत पत्र प्रकरण, कोविड काळात कंत्राट दिल्याचा आरोप, पुण्यातील घटनेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली आहे.
संजय राऊतांचं उद्विग्न पत्र; अमित शाहांच्या मंत्रालयाने पुरतं घेरलं?
‘कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम उद्धव आणि आदित्य यांनी केलं’
कोविड काळात घोटाळ्याचा आरोप करत किरीट सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना लक्ष्य केलं. वडिलांनी आदेश दिला की, संबंधित कंपनीला काम देऊ नका, पण त्यांचेच पुत्र आदित्य ठाकरे यांनी त्याच कंपनीला काम दिलं. कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे काम आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी केलं. पैशांसाठी तुम्ही मुंबई आणि पुणेकरांचा जीव धोक्यात घातला, असं किरीट सोमय्या म्हणाले. ५८ कोटी रुपयांचे कंत्राट सुजित पाटकर यांना चहल यांनी दिले, सुजित पाटकर राऊत यांचा भागीदार आहे. संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवारानं काळी कामे केली आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
‘एवढं फ्रस्ट्रेशन तब्येतीला चांगलं नसतं’
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे अनेक खळबळजनक दावे आणि आरोप केले आहेत. या पत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी ईडी आणि भाजपलाही इशारा दिला आहे. मुंबईत ईडीच्या कार्यालयासमोरच जाहीर पत्रकार परिषद घेणार आहे, पुढे काय होतंय ते फक्त पाहा, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत, एवढं फ्रस्ट्रेशन तब्येतीला चांगलं नसतं, काळजी घ्या. तुमचे बंधू मंत्री होतील. तुमचंही प्रमोशन होईल आणि तुम्ही देखील मुख्य संपादक व्हाल, असा खोचक सल्ला त्यांनी दिला. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी अवस्था तुमची केली आहे आणि ईडी वगैरे तुमच्यासाठी किरकोळ आहेत. ५५ लाख रुपये तुम्ही असेच देऊन टाकाल, असंही ते म्हणाले. संजय राऊत यांनी जे घोटाळे केले आहेत, त्याचे उत्तर देण्यास ते तयार नाहीत, असंही ते म्हणाले.
पुण्यातील घटनेवरून आक्रमक
पुण्यातील घटनेवरून सोमय्या यांनी आक्रमक होत अनेक आरोप केले आहेत. पुण्यात सीआयएसएफचे सिनिअर कमांडो आले आहेत. अमिताभ गुप्ता हे नि:ष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. संजय राऊत यांनाही चौकशीची भीती वाटतेय. मी जेव्हा पुणे महापालिकेत गेलो, तेव्हा एकही पोलीस तिथे नव्हता. मला मारहाण करण्याचे आदेश गुप्ता यांना दिले होते, त्याचमुळे त्यांनी एकही पोलीस पाठवला नाही. गुप्ता यांना तात्काळ पुण्यातून हटवा, अशी मी मागणी करतो, असे सोमय्या म्हणाले. एका किरीट सोमय्याची हत्या झाली, तर शंभर किरीट सोमय्या तयार होतील, असं ते म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे इतके सज्जन व्यक्ती आहेत की, त्यांनी काहीही न बघता वक्तव्य केले आहे. याचे उत्तर त्यांनी द्यावे, असंही ते म्हणाले.