भिवंडीतील फातिमा नगर परिसरात आज, बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत मोठी वित्तहानी झाली असली तरी, सुदैवानं कुणीही यात जखमी झालेले नाही. या परिसरात १०० हून अधिक वेगवेगळी गोदामे आहेत. त्यातील अंदाजे २० गोदामे या आगीत खाक झाले, अशी माहिती भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली.
तत्पूर्वी, आगीच्या घटनेची माहिती मिळताच, सुरुवातीला अग्निशमन बंब आणि पाण्याचे टँकर घेऊन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. सकाळी साडेसहाच्या सुमारास लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. तब्बल पाच तासांनी म्हणजेच सकाळी साडेअकराच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. कुलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.