कोल्हापूर : कचरा घोट्याळ्यातील अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध करत भाजप कार्यकर्त्यांनी थेट महानगरपालिका प्रशासकाच्या कार्यालयात धडक मारत हल्लाबोल केला. आरोग्य निरीक्षकांसह प्रशासकांच्या निषेधार्थ घोषणा देत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केल्याने महानगरपालिका अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर आंदोलन शांत करण्यासाठी डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, फौजदारांसह २० पोलिसांनी कार्यालयात धाव घेतल्याचं चित्र महानगरपालिकेत पाहायला मिळाले. (Kolhapur Bjp)

महानगरपालिकेच्या कचरा प्रकल्पातील कचरा कसबा बावड्यातील थेट शेतात टाकल्याने एक महिन्यापूर्वी भाजपने आंदोलन केले होते. आंदोलनानंतर विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेला नोटीस पाठवली आहे. पण या नोटीशीला महानगरपालिकेकडून उत्तर देण्यास विलंब होत असून दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत भाजपने महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आंदोलन केले.

Nitesh Rane: नितेश राणेंना जामीन मिळताच भावाचा चेहरा खुलला; म्हणाले…

महानगरपालिकेसमोर निदर्शने झाल्यानंतर भाजप कार्यकर्ते थेट महानगरपालिकेच्या इमारतीत घुसले. त्यांनी थेट महानगरपालिका प्रशासक कादबंरी बलकवडे यांच्या कार्यालयावर हल्लाबोल केला. यावेळी प्रशासक बलकवडे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत होत्या. त्यांनी बैठक गुंडाळून मीटिंग हॉल सोडला. त्यानंतर प्रशासनाचा निषेध करत भाजप कार्यकर्ते मीटिंग हॉलमध्ये घुसले. त्यांनी आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या निषेधाचा घोषणा दिल्या. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत अडसूळ, संजय भोसले यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सरचिटणीस विजय जाधव, जिल्हा महिला अध्यक्षा गायत्री राऊत यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.

दरम्यान, प्रशासकाच्या कार्यालयात भाजप कार्यकर्ते घुसल्याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार आणि पोलिसांचा ताफा कार्यालयात आला. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण कारवाईसंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नसल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. अखेर लेखी आश्वासनाची हमी मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
……………………………………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here