इस्लामाबाद, पाकिस्तान :

भारतातील कर्नाटक राज्यात एका शैक्षणिक संस्थेत सुरू झालेल्या ‘हिजाब बंदी‘ वादावरून रणकंदन माजलंय. हिजाब परिधान केलेल्या एका मुलीला घेरून काही तरुण मुले जय श्रीरामच्या घोषणा देत असल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या वादाला पाकिस्तानकडून फोडणी देण्याचं काम केलं जातंय. या घटनेची चर्चा पाकिस्तानातही सुरू आहे. याच दरम्यान पाकिस्तानचा विरोधी पक्ष मुस्लीम लीग (नवाझ) च्या नेत्या आणि पाकिस्तानाचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ यांनीही या वादात उडी घेतलीय.

मरियम नवाझ यांनी सोशल मीडिया प्रोफाईलवर आपला फोटो बदलत हिजाब परिधान करणाऱ्या मुलीचं समर्थन केलंय.

मरियम नवाझ यांनी ट्विटरच्या आपल्या प्रोफाईल फोटोच्या ऐवजी व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येणाऱ्या मुस्लीम तरुणी मुस्कान हिचा फोटो लावलाय. या फोटोत मुस्कान हात वर करून हिजाब बंदीला आपला विरोध दर्शवत आहे. या फोटोला कॅप्शन देताना #NewProfilePic (नवी प्रोफाईल फोटो) इतकंच मरियम नवाझ यांनी म्हटलंय.

मरियम नवाझ यांच्याअगोदर मूळ पाकिस्तानी नागरिक आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझई हिनेदेखील कर्नाटकातल्या ‘हिजाब बंदी’विरुद्ध प्रतिक्रिया नोंदवली. ‘मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्यापासून रोखणं हे भयंकर आहे. महिलांना त्यांच्या कमी – अधिक कपड्यांवरून जोखलं जातं. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना कमी लेखणं थांबवायला हवं’ असं ट्विट मलालानं केलंय.

कर्नाटक हिजाब वाद : मुस्लिमांच्या दडपशाहीचा कट, पाकिस्तानकडून आगीत तेल
‘ह्युंदाई’च्या ‘त्या’ पोस्टवरून गदारोळ; दक्षिण कोरियाची भारताकडे दिलगिरी
मुस्कानचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर मुस्कान हिचा व्हिडिओ दोन दिवसांपासून व्हायरल होताना दिसतोय. यावर नोबेल शांती पुरस्कार विजेती मलाला युसुफझई हिच्यासहीत अनेक पाकिस्तानी नेत्यांनी टिप्पणी केलीय.

मुस्कान ही कर्नाटकच्या मांड्या महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे. मंगळवारी हिजाब परिधान करून ती महाविद्यालय परिसरात दाखल झाली होती.

आपली स्कुटर पार्क केल्यानंतर ती पुढे चालू लागताच जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या गर्दीनं तिला घेरलं. गर्दीला जवळ येताना पाहून मुस्कान जराही भेदरली नाही, तर तिनं या घोषणांना ‘अल्लाहू अकबर‘ घोषणा देत प्रत्यूत्तर दिलं. मुस्कानसोबत घडलेल्या या घटनेनंतर कर्नाटकात हिजाब बंदीविरुद्ध वातावरण तापलंय.

दरम्यान, मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणं हे मानवी हक्कांचं उल्लंघन आहे. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणं आणि हिजाब परिधान केला म्हणून त्यांचा छळ केला जाणं हे अन्यायकारक आहे. मुस्लिमांना दडपण्याच्या भारत सरकारच्या योजनेचा हा एक भाग आहे, हे जगानं समजून घ्यायला हवं, असं ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केलंय.

खराखुरा हिरो! चिमुरड्याला वाचवण्यासाठी तीन दिवस हातानं खोदली जमीन पण…
रशिया – युक्रेन तणावात फ्रान्सची शिष्टाई; संवाद पुढे सरकण्याची आशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here