सोलापूर : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या आणि संपूर्ण देशभरात तुफान लोकप्रिय ठरलेल्या ‘पुष्पा’ या सिनेमाची चर्चा अजूनही सुरू आहे. फिल्मी दुनियेत ‘मै झुकेगा नहीं’ म्हणत पोलिसांना चकवा देणाऱ्या ‘पुष्पा’सारख्या आरोपींना रिअल लाईफमध्ये मात्र पोलीस कारवाई करत झुकवत आहेत. चंदन चोरी करणाऱ्या सांगलीतील आरोपींवर कारवाई झाल्याची घटना ताजी असतानाच सोलापुरातही पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली आहे. ओल्या सुगंधी चंदनाची कारमधून वाहतूक करणार्‍या दोन आरोपींना पंढरपूर तालुका पोलीस आणि वनविभागाने अटक केली आहे. (Pushpa Movie Copy)

पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत १३२ किलो ९०० ग्रॅम सुगंधी चंदन आणि कार असा एकूण १२ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पंढरपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर-मोहोळ मार्गावरील तीन रस्ता येथे वाहन तपासणी दरम्यान सिल्व्हर रंगाच्या इर्टिका कार (एम.एच ४२,के ७६११) मध्ये पोत्यात सुगंधी चंदनाची ओली लाकडे आढळून आली.

हायकोर्टाच्या खंडपीठासाठी प्रस्तावच नाही: केंद्राचे स्पष्टीकरण; नुसत्या भेटीगाठीच?

यामध्ये एकूण चार नायलनच्या पोत्यांमध्ये सुगंधी चंदनाची १३२ किलो ९०० ग्रॅम ओली लाकडे सापडली. ज्यांची बाजारातील किंमत ७ लाख ९८ हजार रुपये व ५ लाख रुपये किमतीची एक सिल्व्हर रंगाची इर्टिका कार असा एकूण १२ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी वनपाल एस.एस.पतकी, वनरक्षक एस.डी. कांबळे यांनी सर्व मालाची पाहणी करुन पंचनामा केला आहे. यामध्ये पोलिसांनी चालक रमेश महादेव तेलंग (वय २५ वर्षे रा.तुंगत ता.पंढरपूर जि.सोलापूर), कचरुद्दीन अल्लामीन जमादार (वय ३५ वर्षे, रा.पेनुर ता.मोहोळ जि.सोलापूर) या दोघांना अटक केली आहे. या दोघांवर भादंवि संहिता कलम ३७९, ३४ सह भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१, ४२, ६६, ६६ (अ) व महाराष्ट्र नियमावली २०१४ नियम ८२ व महाराष्ट्र अधिनियम कलम २९ प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here