पुणे बातम्या आजच्या: पुण्यातील ओशो आश्रमात आर्थिक घोटाळा, थेट भूखंड विक्रीचा घाट; ईडी चौकशीची मागणी – financial scam at osho ashram in pune sale of plot demand for ed inquiry
औरंगाबाद : पुण्यातील ओशो आश्रमात फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळे होत असून, या आश्रमाच्या एका भूखंडाच्या परस्पर विक्रीचाही घाट घालण्यात आला आहे. आश्रमातील विश्वस्तांकडून मनमानी सुरू आहे आणि या घोटाळ्यांची सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ओशो अजिंठा एलोरा मेडिटेशन कम्युन (औरंगाबाद) व ओशो ब्लेसिंग्ज मेडिटेशन कम्युनच्या (नांदेड) वतीने बुधवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
पुण्यातील आश्रमात विश्वस्तांकडून मागच्या अनेक वर्षांपासून मनमानी केली जात आहे. ओशोंच्या इतर शिष्यांना दूर सारुन आणि अत्यंत अपमानास्पद वागणूक देत ओशोंच्या कॉपीराइटच्या नावाखाली वेगवेगळे आर्थिक घोटाळे केले जात आहे. या घोटाळ्यांतून कोट्यवधींची मालमत्ता आश्रमाच्या विश्वस्तांनी लाटली आहे. त्याशिवाय आश्रमात येण्या-जाण्यावर विचित्र निर्बंध आणण्यात आले आहेत. पुण्यातील नागरिकांनाही खुला प्रवेश राहिलेला नसतानाच, आश्रमातील गौतम बुद्धांचा पुतळा हटवण्यात आला आहे. खुद्द ओशोंनी शिष्यांना दिलेली माळ घालण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. आता तर आश्रमातील मोठा भूखंड विक्रीचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. या विरुद्ध मुंबईतील धर्मादाय आयुक्तालयात लेखी तक्रार करण्यात आली असून, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडेही दाद मागण्यात आली आहे. नोकरभरतीसाठी ‘सीईओं’ची परवानगी सक्तीची सरकारने या घोटाळ्यांची ईडी चौकशी करावी, अशी मागणी ओशो कम्युनचे स्वामी मोक्ष, स्वामी गोपालभारती, स्वामी प्रत्यनगिरे, प्रशांत स्वामी, वंदना जाधव, प्रेम उत्थान आदींनी पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी २१ मार्च २०२२ या ओशो संबोधी दिनाच्या निमित्ताने सर्व संन्यासी मित्र ओशोंची संन्यास माळा आणि मैरुन रोब परिधान करुन पुणेस्थित ओशो कम्युनमध्ये जातील आणि समाधीस्थळी मौन धारण करुन शांत बसतील. यात कोणताही हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. गुरू पौर्णिमेचा उत्सव जुन्या बुद्ध हॉलमध्ये व्हावा, यात कोणासही चप्पल किंवा बूट घालून प्रवेश नसावा, आठ सप्टेंबरला ओशोंच्या वडिलांच्या समाधी ठिकाणी किर्तन ध्यानाची परवानगी मिळावी, ११ डिसेंबरला ओशोंचा जन्मदिवस पुणे आश्रमात साजरा करण्याची परवानगी मिळावी, ओशो समाधी पुनर्स्थापित केली जावी आदी मागण्याही कम्युनच्या वतीने करण्यात आले आहे.