इराणमधून अवघ्या जगासाठी धक्कादायक ठरलेली एक घटना समोर येतेय. अवैध संबंधांच्या संशयानं पछाडलेल्या एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलंय. त्याहून धक्कादायक म्हणजे, आपल्या पत्नीचं धडावेगळं केलेलं शीर हातात घेऊन तो रस्त्यावर फिरताना दिसला. काही कॅमेऱ्यांनी या व्यक्तीचं हे भयंकर कृत्य टिपलं आणि पाहता पाहताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हे दृश्यं पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा उभा राहिला. या व्यक्तीचा पत्नीचं शीर हातात घेतलेल्या अवस्थेत एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्यक्तीच्या दुसऱ्या हातात चाकूही दिसून आला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुख्य आरोपीसहीत दोन जणांना अटक केली. मृत महिलेचं नाव मोना हैदरी असल्याचं सांगण्यात येतंय.
इराणची वृत्तसंस्था ‘आयआरएनए’नं दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मोना हैदरी हिची हत्या तिचा पती आणि दीरानं मिळून केली. दक्षिण पश्चिम शहर अहवाज मध्ये ही घटना घडली.
घटनेनंतर दोन्ही आरोपी लपून बसले होते. हे ठिकाण शोधून काढून सोमवारी या घटनेत पोलिसांनी दोघांना अटक केली.
बालविवाह हा इराणमध्ये अतिशय वादाचा मुद्दा ठरतोय. विवाहाचं वय वाढवण्याची मागणी सुजान नागरिकांकडून करण्यात येतेय. सध्या इराणमध्ये विवाहासाठी मुलींचं वय कमीत कमी १३ वर्ष असावं, असं कायदेशीररित्या निश्चित करण्यात आलंय.
ही घटना समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा घटना रोखण्यासाठी सामाजिक प्रबोधनाची गरज व्यक्त केलीय. इराणमध्ये सामाजिक आणि कायदेशीर सुधारणेची आवश्यकता असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.