यावेळी नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीविषयीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान मोदी हे काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करतात. आम्ही घराणेशाहीच्या विरोधात आहोत, असं म्हणतात. पण उत्तर प्रदेशात भाजपने घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ५६ जणांना उमेदवारी दिली आहे. या सर्व उमेदवारांच्या घरातील कोणी ना कोणी यापूर्वी राजकारणात होते. तर गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पती-पत्नीच्या तीन जोड्यांना उमेदवारी दिली आहे. गोव्यात भाजपकडून विश्वजीत राणे- देविया राणे, बाबूश मोन्सेरात-जेनिफर मोन्सेरात आणि चंद्रकांत कावलेकर-सावित्री कावलेकर या तीन जोडप्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे भाजप दुसऱ्यांवर टीका करताना स्वत:च्या पक्षातील घराणेशाही लपवते. एवढंच कशाला गोव्याचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस हे देखील घराणेशाहीचंच प्रॉडक्ट असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली.
नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले होते?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एनएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना भाजपमध्येही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. त्यावर नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि काँग्रेसच्या घराणेशाहीतील फरक स्पष्ट केला होता. भाजपमध्ये एकाच घराण्यातील अनेकजण खासदार किंवा आमदार असले तरी लोक त्यांना निवडून देतात. पण काँग्रेसमध्ये अशी परिस्थिती नाही. एकाच घराण्यातील लोकांचे संपूर्ण पक्षावर वर्चस्व असते. एकाच घरातील लोक पक्षाचे अध्यक्ष, खजिनदार आणि अन्य पदे भुषवत असतात. हा काँग्रेस आणि भाजपच्या घराणेशाहीतील मुलभूत फरक असल्याचे मोदी यांनी सांगितले होते. काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पक्षातील इतर गुणवंतांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल, हरियाणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांमधील घराणेशाहीवर बोट ठेवले होते. विशेष म्हणजे यावेळी नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ठाकरे घराण्याचा उल्लेख टाळला होता.