मनसेच्या आजच्या बैठकीला पक्षाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई महानगरपालिकेबाबत फारशी चर्चा झाली नाही. पुणे, नाशिक आणि इतर महानगरपालिकांविषयी आज चर्चा झाली. मुंबई सोडून ठाणे, पुणे, नाशिक ज्या ठिकाणी निवडणूक आहे, त्या ठिकाणी टीम जाणार आहे. त्या टीममधील नेत्यांनी वैयक्तिकरित्या राज ठाकरे यांना अहवाल द्यायचा आहे. याचबरोबर आमची कोअर टीमची देखील बैठक होणार आहे. प्रत्येक भागातील पदाधिकाऱ्यांना स्वत:चा अहवाल देण्याच्या सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसेच मनसेकडून पालिका निवडणुकीसाठी तयार आलेल्या प्रत्येक समितीमध्ये तीन ते चार सदस्यांची नेमणूक करण्यात आल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
गेल्याच आठवड्यात वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीसाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती आखण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांमा महत्त्वाच्या सूचनाही दिल्या होत्या. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना स्वबळावर लढण्याच्यादृष्टीने तयारी करायला सांगितली आहे. युतीच्या चर्चेत न पडता कामाला लागा. एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका होतील, हे गृहीत धरुन तयारीला सुरुवात करावी, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितल्याचे समजते.