दत्तात्रेय सदाफुले हे दुपारी त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी नगर शहरापासून काही अंतरावर असलेल्या निबोंडी येथे एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये ते खाली पडून गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नगरला हलवले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी नगरला धाव घेतली. भिंगार कँप पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध सुरू आहे.
सदाफुले यांना निंबोडीजवळ एका इंडिका कारने धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. त्यावेळी विरूद्ध बाजूने येणाऱ्या दुसऱ्या वाहनाखाली सापडून ते ठार झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य असताना सदाफुले यांनी गावाच्या पाणी प्रश्नासाठी चांगले काम केले होते. त्यांच्या अपघाताचे वृत्त कळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.