कोल्हापूर : ‘राज्यात करोनाची तिसरी लाट फारशी गंभीर नाही, त्यामुळे निर्बंध टप्प्याटप्याने कमी करण्यात येतील, मात्र मास्कमुक्ती सध्या तरी होणार नाही,’ अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. फ्रान्स, जर्मनसह काही देशात मास्कमुक्ती निर्णयामागील नेमके तंत्र काय होतं, याची माहिती संकलित करण्यात येत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. (Health Minister Rajesh Tope On Corona)

आरोग्यमंत्री टोपे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, करोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे. यामुळे मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली. पण, मास्कमुक्तीचा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला गेला नाही. काही देश कोणत्या पद्धतीने मास्क फ्री झाले याची माहिती घेण्यात येत आहे. टास्क फोर्स आणि केंद्राकडे ते पाठवून पुढील निर्णय घेतला जाईल. पण तोपर्यंत निर्बंध मोठ्या प्रमाणात कमी करण्यात येतील.

Covid 19 Update: करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत सर्वात मोठी बातमी; रुग्णसंख्येच्या उद्रेकानंतर आता…

करोनाचा संसर्ग पसरवण्यात महाराष्ट्र अग्रेसर होता या पंतप्रधानांच्या आरोपाबाबतही टोपे यांनी खुलासा केला आहे. ‘राज्याने दोन वर्षात करोनावर मात करण्यासाठी अतिशय चांगलं काम केले आहे. सर्वसामान्य रूग्ण हाच केंद्रबिंदू मानून काम केल्याने आरोग्य संघटनेसह अनेकांनी राज्याच्या कामाचे कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या कामासाठी तिजोरी रिकामी करण्याचा आदेश दिल्यानेच हे शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

ग्रामीण आणि उपजिल्हा रूग्णालये अद्यावत करण्यात येणार असल्याची माहिती देताना मंत्री टोपे म्हणाले की, तालुका पातळीवर सिटीस्कॅन, एमआरआय आणि सोनोग्राफी या तंत्रज्ञानाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल. घराजवळ आरोग्य सेवा हाच आता सरकारचा संकल्प आहे, असंही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here