जळगाव महापालिकेच्या १२ मे २०२१ रोजी झालेल्या महासभेत गाळ्यांप्रकरणी मनपाचे धोरण निश्चित झाल्यानंतर गाळेधारकांना मनपा अधिनियमानुसार नुतनीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मनपा प्रशासनाने भोईटे मार्केटमधील गाळेधारकांना ३१ जानेवारीपर्यंत थकीत भाड्याची रक्कम भरण्यासह नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव सादर करण्याचा सूचना मनपा दिल्या होत्या. मात्र, या मुदतीत या मार्केटमधील एकाही गाळेधारकाने थकीत भाड्याची रक्कम व नुतनीकरणासाठीचे प्रस्ताव देखील सादर केले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मनपा उपायुक्त प्रशांत पाटील व शाम गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून गुरुवारी दुपारी १२ वाजता कारवाईला सुरुवात झाली. अवघ्या २ तासातच मनपाच्या पथकाने या मार्केटमधील सर्वच म्हणजे २४ दुकाने सील केली आहेत. याआधी मनपाने महात्मा फुले मार्केटमधील १३ दुकाने एकाच वेळी सील करण्याची कारवाई केली होती. कारवाई करण्याआधी संबधित गाळेधारकांना मनपाची थकीत भाड्याची रक्कम भरण्याचा सूचना देण्यात आल्या. मात्र, कोणीही थकीत भाड्याची रक्कम भरली नसल्याची माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली.
जप्त गाळ्यांचा लिलाव होणार
महापालिका अधिनियमानुसार जे गाळेधारक नुतनीकरणाचे निकष पूर्ण करतील असेच गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. अन्यथा गाळेधारक नुतनीकरणासाठी पात्र नाहीत, असं समजून गाळे जप्त केल्यानंतर या गाळ्यांचा जाहीर लिलाव करण्याची कारवाई महापालिका प्रशासन करू शकते.