पेरुमध्ये एक भीषण अपघात घडलाय. एका रस्ते अपघातात तब्बल २० जणांना आपले प्राण गमवावे लागलेत तर जवळपास ३० जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
गुरुवारी ही भीषण दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस जवळपास १०० मीटर (३२८ फूट) खोल दरी कोसळल्यानं हा अपघात घडला.
स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना घेऊन ही बस तैयबाम्बाहून त्रुजिलोकडे (Tayabamba to Trujillo) निघाली होती. या दोन ठिकाणांमध्ये जवळपास ३४० किलोमीटरचं अंतर आहे. रस्त्याची अवस्था अतिशय बिकट असल्यानं रस्त्यावरून हे अंतर प्रवास करण्यासाठी जवळपास १४ तासांचा वेळ लागतो.
उल्लेखनीय म्हणजे, पेरूमध्ये या अगोदरही अशा पद्धतीचे अनेक रस्ते अपघात घडलेत. वाहनांचा अनियंत्रित वेग आणि रस्त्यांची दूरावस्था हे या रस्ते अपघातामागील प्रमुख कारणं आहेत.
गेल्या १० नोव्हेंबर रोजी उत्तर पेरूच्या एका जंगलात एका मिनीबसला झालेल्या रस्ते अपघातात काही प्रवाशांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं.