सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे हे गुरुवारी न्यायालयीन कोठडीतून बाहेर आले होते. नितेश राणे यांनी बाहेर पडताच शिवसेनेवर टीका करायला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे जामीन अर्जाची सुनावणी सुरु असताना संपूर्ण काळ नितेश राणे यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी सिंधुदुर्गातून कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्याठिकाणीही नितेश यांची तब्येत फारशी सुधारली नव्हती. मात्र, जामिन मिळाल्यानंतर नितेश राणे यांना गुरुवारी रुग्णालयातून लगेच डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर नितेश राणे यांनी सावंतवाडीला येत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आणि ते मुक्त झाले. विशेष म्हणजे आदल्या दिवशीपर्यंत तब्येत बिघडलेले नितेश राणे त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी थेट गोव्यात गेले होते. माझ्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची सभा असल्यामुळे मी पेनकिलर्स घेऊन गोव्यात आल्याचे नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
‘तेव्हाच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा कसा येतो?’
नितेश राणे यांनी न्यायालयीन कोठडीतून बाहेर येतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागले होते. माझ्या आरोग्याबाबत सतत संशय व्यक्त करून प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही देखील असे प्रश्न उपस्थित करू शकतो. माझे आजारपण खोटे आहे असे काहीजण म्हणतात. पण मग आरोग्य यंत्रणा ज्या तपासण्या करतात ते सर्व खोटे आहे का?, आता जेव्हा मी तपासणी केली तेव्हा माजा रक्तदाब १५४ इतका होता. आता हे खोटे आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला होता.
असे प्रश्न उपस्थित करणे योग्य नसून ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे प्रश्न आम्हीही उपस्थित करू शकतो असे सांगत ते म्हणाले की, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते आणि जेव्हा ईडीच्या कारवाया सुरू होतात तेव्हाच मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात? मुख्यमंत्री जेव्हा लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी जातात तेव्हा ते पट्टा वापरत नाहीत. मग अधिवेशनाच्या वेळीच मुख्यमंत्री आजारी का पडतात? जेव्हा ईडीच्या कारवाया होतात तेव्हाच त्यांना करोना कसा होतो? असे सवाल उपस्थित करताना राज्यातील राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले होते.