‘सोशल मीडिया हा कलाकारांसाठी बायोडेटा किंवा त्यांचं प्रोफाइल म्हणून काम करतो. सोशल मीडिया जेव्हा तुमचा ताबा घेऊ लागतो, तेव्हा मात्र त्याला ताब्यात ठेवायला हवं, कारण सतत ‘व्हर्च्युअल लाइफ’ जगणं माणूस म्हणून तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं,’ असं म्हणणं आहे अभिनेत्री अनुष्का सरकटेचं.

रंगभूमी, मालिका यानंतर चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा तुझ्या संघर्षाबद्दल काय सांगशील…
– सर्वच क्षेत्रात असतो, तसा संघर्ष माझ्याही वाट्याला आला. गेल्या दोन वर्षांचा काळ कसोटी पाहणारा होता. या काळात कलाकार म्हणून मी स्वतःवर अधिक काम केलं. चित्रपटात संधी मिळाली आहे. काही काळ डेली सोप करायचा नाही असं ठरवलं आहे. चित्रपटाचं निम्मं चित्रीकरण झालं आहे. चित्रपटगृहं सुरू राहिली, तर वर्षाच्या शेवटी हा चित्रपट प्रदर्शित होईल. पदार्पणातच वेगळी संधी मिळाली आहे. म्युझिक अल्बममध्ये नृत्य केलं आणि नवा शोही करत आहे. नव्या वर्षात भरपूर काही समोर आहे.

या ठरावीक चौकटीपलीकडे फक्त ‘ओटीटी’चे कलाकार म्हणूनही अनेकांना संधी मिळत आहे. तू या माध्यमाचा विचार नाही केलास?
– सगळ्या माध्यमांत दिसण्याचा अट्टहास नाही. कलाकारांसाठी आता माध्यमं एवढी आहेत, की निवड करणं अवघड झालं आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट या सगळ्यांत काम करण्याच्या प्रक्रिया वेगळ्या आहेत. नाटकाच्या तालमी, मालिकेत अगदी समोर तयार होणारे संवाद हातात पडतात आणि तुम्ही तयार होता, चित्रपटासाठी वर्कशॉप होतात, अल्बम, जाहिराती याची प्रक्रिया आणखी वेगळी. या सगळ्यांत अमुकच करायचंय, की सगळंच अनुभवायचं हे आता सांगणं कठीण आहे. कलाकार म्हणून या सगळ्यांत झळकणारं पॅकेज तुमच्यात असेल, तर संधी येतातच.

शास्त्रीय संगीत शिकून गायिका म्हणून रंगभूमीवर पदार्पण करताना अभिनयाकडे कशी वळलीस?
– माझं नाटकही गाण्यापासून सुरू झालं. घरी संगीताचं वातावरण आहे त्यामुळे शास्त्रीय संगीत शिकले. माझं पथनाट्यातलं काम पाहून कॉलेजच्या कल्चरल सेक्रेटरीनं नाटकासाठी विचारलं. ५५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेची भूमिका होती, संवाद नव्हते फक्त हावभावांतून व्यक्त व्हायचं होतं. तिथं माझं काम पाहून भूमिका मिळाली आणि अभिनयप्रवास सुरू झाला. स्पर्धांनंतर काय करावं हा विचार होताच. मुक्ता बर्वे ही माझी आवडती अभिनेत्री. तिच्यासारखं ललित करावं हा विचार मनी आला. आता पुन्हा ललितला जावं, तर लॉकडाउन झालं. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर सरांशी बोलले. ललितमध्ये आता झूमवर अभ्यासक्रम होणार आहेत. तू कॅमेऱ्यासमोर अभिनय करतेस तो करत राहा, तो ही सरावच आहे, शिकणं थांबत नाही, असं सरांनी सांगितलं.

Video- अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ वर रानू मंडल यांनी केला डान्स, यूझर्स म्हणाले- ‘अरे दीदी…’

मालिकांनी काय शिकवलं?
– ‘लक्ष्मीनारायण’ ही पौराणिक मालिका केल्यावर मी ‘कारभारी लय भारी’ या मालिकेत प्रियांका पाटील ही भूमिका साकारली. भूमिका साकारताना भाषेचा लहेजा आधी अवघड गेला. नंतर सरावले. मालिकांच्या प्रक्रियेनं खूप काही शिकवलं. अश्वारोहण, गन फायरिंग शिकले तेव्हाकुठे प्रियांका ही भूमिका मला माझ्यातच सापडत गेली. मला ड्रायव्हिंग आवडतं. मालिकेत पाठलागाचे जे सिक्वेन्स होते, त्यासाठी जिप चालवावी लागली. भूमिकांना स्वतःचं काहीतरी देताना आणि त्यांच्याकडून काही गोष्टी घेताना तुम्ही तिच्याशी एकरूप होत जाता. अभिनय शिकून येतो असं नाही; पण निरीक्षण, सभोवतीच्या माणसांमध्ये, मनात दडलेल्या भाव-भावनांमध्ये त्याचे धागे सापडत जातात.

पुण्यात ट्रेकिंगचा श्रीगणेशा
अनुष्काला ट्रेकिंगची आवड आहे. ती म्हणते, ‘मुंबई-पुण्याबाहेर चित्रीकरण असलं, की मजा येते. मी काम करतेय तो प्रवासावरचाच चित्रपट आहे. सापुतारा, नाशिक, अर्नाळा आणि राहिलेलं चित्रीकरण कोकणात हरिहरेश्वरला होत आहे. भूमिकांसाठी प्रवास करायलाही आवडतं. या सगळ्यांत अनुभवांसह नवं जग शोधण्याची संधी मिळते. नवा शो करतेय त्यातही ही संधी मिळतेय. पुण्यात असताना सिंहगड, तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर असे सगळे गड मी पाहिले. पुण्यात ट्रेकिंगचा श्रीगणेशा झाला. सोलो ट्रॅव्हल करायची इच्छा असून उत्तर भारतात भ्रमंती करणार आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here