मुंबई: मुंबईसह संपूर्ण राज्यात हातपाय पसरणाऱ्या करोना विषाणूला आळा घालणं आता राज्य सरकारला सोपं जाणार आहे. करोना रुग्णांच्या रॅपिड टेस्टला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटातच करोनाची लागण झाली की नाही याचं प्राथमिक निदान करणं शक्य होणार आहे. या रॅपिड टेस्टमुळे वेळही वाचणार आहे आणि रुग्णांवर त्वरित उपचार करणंही शक्य होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. त्यानंतर टोपे यांनी प्रसारमाधम्यांशी सवांद साधताना ही माहिती दिली. राज्यात दररोज ५ हजार चाचण्या करणं शक्य आहे. तेवढी राज्याची क्षमता आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देऊन त्यांना राज्याला रॅपिड टेस्टची परवानगी देण्याची विनंती करण्यात आली. मोदी यांनीही टेस्ट वाढवण्याचा सल्ला दिला आणि त्यांनी तात्काळ रॅपिड टेस्टची परवानगी दिली आहे, अशी माहिती यांनी दिली. रॅपिड टेस्टला मान्यता देण्यात आल्याने प्राथमिक चाचणीतच संबंधित व्यक्तीला करोनाचा प्रादूर्भाव आहे की नाही ते कळेल. तसेच रक्ताचे नमुने घेतल्यावर केवळ ५ मिनिटात करोना आहे की नाही असे समजणारी ही रॅपिड टेस्ट आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं. आपल्याला करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येचा अंदाज आला तर तात्काळ त्यांचं विलगीकरण करत त्यांच्यावर उपचार केले जातील, असंही ते म्हणाले.

प्रत्येक जिल्हात कोविड-१९ रुग्णालय

यावेळी राजेश टोपे यांनी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात करोनावर उपचार व्हावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कोविड-१९ स्पेशल रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे डेडिकेटेड रुग्णालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनेही अशा स्वरुपाची रुग्णालये सुरू करण्याचा आग्रह धरलेला आहे. त्यादृष्टीने आपण तयारी करत आहोत, असंही ते म्हणाले. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाची साधनं उपलब्ध करुन देण्याची विनंती यावेळी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here