अहमदनगर : नगर-दौंड महामागार्वर अपघात वाढल्याच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या शिवसेनेने शुक्रवारी गॅसची पाइप लाइन टाकणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला त्याच रस्त्यावर दोरीने बांधून ठेवले. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अपघातांमध्ये मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमी झालेल्यांना नुकसान भरपाई द्यावी तसंच सुरक्षा उपाय केल्यानंतरच काम सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दोरखंडाने बांधून कॅमेऱ्यासमोर आणण्यात आले. (Ahmednagar Accident News)

नगर-दौंड महामार्गावर नगर तालुक्यातील खडकी शिवारात आठ दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या महामार्गाचं काम झालं आहे. मात्र, तेथे गॅसची पाईपलाइन टाकण्याचं दुसऱ्या एका कंपनीचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने शुक्रवारी हे आंदोलन केले. तेथे काम करणार्‍या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना दोरीने बांधून ठेवले. शिवसेनेचे नेते संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना मंत्र्यासह मुलावर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

हराळ यांनी सांगितलं की, या संबंधी अनेकदा मागणी करून संबंधित अधिकाऱ्यांना भेटून तक्रार करूनही उपयोग होत नाही. अतिशय असुरक्षित वातावरणात हे काम सुरू आहे. त्यामुळे अपघात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आम्हाला नाइलाजास्तव हे आंदोलन करावे लागत आहे. याबद्दल आमच्याविरूद्ध गुन्हेही दाखल केले जातील. मात्र, शिवसेना अशा गुन्ह्यांना घाबरत नाही. कामचुकार आणि लोकांचे जीव घेणाऱ्यांना आम्ही धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. आता तरी संबंधितांनी याची दखल घेऊन योग्य ती दक्षता घेऊन वेळेत काम पूर्ण करावे, मृतांच्या वारसांना आणि जखमींनी नुकसान भरपाई द्यावी, याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांविरूद्ध सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या कार्ले यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here