अहमदनगर : राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तर सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास १४ फेब्रुवारीपासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. मात्र आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाव न घेता हजारे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. (Chhagan Bhujbal News)

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नाटेगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचे समर्थन करताना भुजबळ यांनी आण्णा हजारे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

पुण्यातील धक्काबुक्की प्रकरण; पोलिसांनी नोंदवला किरीट सोमय्या यांचा जबाब

छगन भुजबळ म्हणाले की, आपल्याकडे आंदोलनाला तोटा नाही. आता समाजसेवक पण याबाबतीत जागे झाले. वाईनविरोधात उपोषण करणार, आंदोलन करणार असं म्हणतात. ७ वर्षात या देशात काय सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या दरवाजावर बसले, ७५० शेतकरी मृत्युमुखी पडले, मात्र यावेळी कोणी उपोषण केलं नाही. नोटाबंदी व जीएसटीमुळे ४ कोटी लोक बेरोजगार झाले. हे काही दिसलं नाही आणि वाईनच्या बाबतीत ताबडतोब उपोषणाला बसणार आहेत. वाईन ठेवायला कोणी जबरदस्ती केली नाही, आम्ही फक्त परवानगी देणार आहोत, असं भुजबळ म्हणाले.

‘द्राक्ष पिकाला प्रोत्साहन देण्याचे काम पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हापासून करतात. महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे दीड दारूची दुकाने आहेत. कर्नाटकात ७ तर मध्यप्रदेशमध्ये ५ दुकाने आहेत. मध्य प्रदेशमध्ये जर इन्कम एक कोटी असेल तर घरातच परमिट रूम सुरू करण्यासाठी परवानगी आहे. मग हा मध्यप्रदेश की मद्यप्रदेश? विरोधकांचे तिकडे लक्ष जात नाही, फक्त महाराष्ट्रतच जाते,’ अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here