दापोलीच्या नगराध्यक्षपदी ममता मोरे व उपनगराध्यक्षपदी खालीद रखांगे विराजमान झाले. परब यांनी मोरे आणि रखांगे यांना शुभेच्छा दिल्या. मंडणगड नगराध्यक्ष सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनाही यावेळी त्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बहुमत देऊन विरोधकांना योग्य ते उत्तर देण्यात आले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. दापोली, मंडणगड शहर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री अनिल परब यांनी दिली. यावेळी त्यांनी आपण आज कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही. योग्यवेळी राजकीय समाचार योग्य व्यासपीठावर घेऊ, असे सांगत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना अप्रत्यक्ष इशारा दिला. माजी आमदार संजय कदम यांनी नगरपंचायत सभागृहात सर्वात आधी दापोली तालुका कुणबी भवन विषय मार्गी लावला जाईल, त्याला मान्यता दिली जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
दापोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
अशी झाली निवडणूक प्रक्रिया
दापोली नगरपंचायत नगराध्यक्षपदी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या ममता मोरे, तर उपनगराध्यक्षपदी खालिद रखांगे विराजमान झाले आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून त्यांचे नाव आठ दिवसांपूर्वी निश्चित करण्यात आले होते. शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांना अपक्ष कृपा घाग, प्रिती शिर्के यांची दोन मते मिळाली. विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी खानविलकर यांनी स्वतःचे मतही ममता मोरे यांना देऊन व्हीप विरोधात जाऊन होणारी कारवाई टाळली. भाजपच्या जया साळवी या तटस्थ राहिल्या. या निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्हा भूमीसंपादन उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता लष्करे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी काम पाहिले. हात उंचावून ही मतदान प्रक्रिया घेण्यात आली. दरम्यान या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता मोरे यांनी आपण शहर विकासासाठी कटिबद्ध असून शहराचा उत्तम विकास करणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांनी पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, संजयराव कदम, उद्योजक सदानंद कदम,अजय बिरवटकर,संदीप राजपुरे, किशोर देसाई, ऋषी गुजर आदींसह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times