मुंबई: ‘लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर दिसणाऱ्या मोजक्या लोकांना सरसकट दोष देणं योग्य नाही. त्यांची घरं छोटी आहेत. घरात बसायला जागा नाही म्हणून ते रस्त्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यावर येऊन बसतात. याचा अर्थ त्यांना परिस्थितीचं गांभीर्य नाही असं नाही. पण, सामाजिक जाणीव नसलेले लोक त्यांना दोष देतात,’ अशी टीका राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लॉकडाऊनच्या काळातही काही लोक रस्त्यावर दिसतात. त्याबद्दल त्यांना विचारलं असता आव्हाड यांनी काहीसं वेगळं मत मांडलं. ‘करोना हा भारतातला रोग नाही. तो बाहेरून आलेला आहे. त्यात रेशन कार्डवाल्यांचा काही दोष नाही. पासपोर्टवाल्यांचा दोष आहे. मात्र, आता रेशन कार्डवाल्यांना भोगावं लागतं आहे. त्यांच्या घरात बसायला जागा नाही म्हणून त्यांना रस्त्यावर यावं लागतं. दक्षिण मुंबईत हे चित्र दिसणार नाही. कारण, तिथले लोक फार्महाऊसवर निघून गेले आहेत. अलिबागची अनेक फार्महाऊस फुल्ल झाली आहेत. लोक सेल्फ क्वारंटाइनमध्ये आराम करत आहेत,’ असं आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांचा मतदारसंघ असलेल्या कळवा-मुंब्रा भागातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘आधीपेक्षा आता गर्दी कमी झालीय. मुंब्र्यात बरेच लोक घराबाहेर पडायचे. आता मोजकेच लोक बाहेर पडतात. रुग्ण वाढू लागल्यापासून जिवाच्या भीतीनं गर्दी कमी झालीय. लोक गंभीर झालेत. कळवा पूर्वेकडची परिस्थिती समजून घ्यायला हवी. घरात माणसं जास्त आणि घर अगदी छोटं असतं. दहा बाय दहाच्या खोलीत सगळं जिथल्या तिथं ठेवल्यानंतर राहिलेल्या जागेत किती लोक बसणार हेही आपण पाहायला हवं,’ असं आव्हाड म्हणाले. ‘अनेक घरांमध्ये लोक एकवेळ खाऊन जगत आहेत. हे वास्तव समोर आल्यास पंतप्रधान मोदींकडून मोफत दिलं जाणारं रेशन लवकर मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here