गेल्या काही दिवसांमध्ये किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या मुलींची वाइन व्यवसायात मोठी गुंतवणूक आहेत. एका बड्या उद्योजकासोबत त्यांनी भागीदारी केली आहे. संजय राऊत यांनी ही माहिती दडवून ठेवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्यावरही सोमय्या यांनी कोव्हिड सेंटरच्या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनीच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यातील कोव्हिड सेंटरची कंत्राटे मिळवली होती. यासाठी किरीट सोमय्या यांनी पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पुणे महानगरपालिकेत तक्रार देण्यासाठी जात असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना धक्काबुक्कीही केली होती. झेड दर्जाची सुरक्षाव्यवस्था असणारे किरीट सोमय्या या धक्काबुक्कीत खालीही पडले होते. यावरुन बराच गदारोळही निर्माण झाला होता.
पुण्यातील कोव्हिड सेंटरंच कंत्राट चहावाल्याला?
पुण्यातील कोव्हिड सेंटरंच कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा नवा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरचे कंत्राट चहा विकणाऱ्या राजीव साळुंखे यांच्या न्यू लाईफ कंपनीला देण्यात आले. फक्त १ लाख उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला १०० कोटी रुपयांचे कंत्राट कसे काय दिले जाऊ शकते, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.