गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत आहेत. मात्र, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील पत्रकारपरिषदेत ‘ईडी’वर आगपाखड केली होती. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी काहीजणांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, मी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्याने ‘ईडी’च्या माध्यमातून मला लक्ष्य केले जात आहे. ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्रास देत आहेत. माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारपरिषद घेईन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता सर्वांनाच संजय राऊत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.
संजय राऊत यांची ‘ईडी’वर आगपाखड
ईडीच्या अधिकाऱ्यांवरच आर्थिक घोटाळ्याचे गुन्हे आहेत. या अधिकाऱ्यांचे बाहेर वसूली एजंट आहेत. त्यांच्या माध्यमातून ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करतात. मला आणि ठाकरे परिवाराला ईडीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. ईडी ही मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या वरती आहे का? ईडीच्या माध्यमातून फेडरल सिस्टीमची वाट लावली जात आहे. इतके दिवस देशाचा प्रश्न आहे म्हणून मी गप्प बसलो होतो. पण ही मुंबई आहे आणि मुंबईतील दादा हा शिवसैनिकच आहे. आता तुम्ही पाहाच काय होतं. मी लवकरच शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहे. त्यानंतरची पत्रकारपरिषद मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर घेईन, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. ईडीला या सगळ्याची किंमत मोजायला लागेल. मीदेखील याची किंमत मोजायला तयार आहे, अशा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.