मुंबई : एसटीचे प्रवासी ट्रॅव्हल्स, खासगी बसवाले पळवतात, अशा तक्रारी अनेकदा केल्या जातात. मात्र आता थेट एसटीतूनच प्रवासी पळविण्याचा प्रकार शिवनेरी-शिवशाहीतील खासगी चालकांनी सुरू केला आहे. तिकिटांपेक्षा कमी रक्कम परस्पर घेऊन हे चालक प्रवाशांना विनातिकीट प्रवास घडवत असल्याचे समोर आले आहे.

खासगी बसमध्ये ‘केबिन’ अर्थात चालकाच्या शेजारी बसणाऱ्या प्रवाशांचे पैसे ही चालक-क्लिनरची ‘केबिन कमाई’ असते. खासगी बसमालक प्रत्येक आसनांनुसार हिशेब घेत असल्याने चालकांच्या केबिन कमाईवर त्यांचा सहसा आक्षेप नसतो. या पद्धतीने प्रवास प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. संपकाळात खासगी चालकांची नियुक्ती झाल्यापासून असाच काहीसा प्रकार एसटीतही सुरू झाल्याने त्याचा फटका महामंडळाला बसत आहे, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले.

निम्मी मुंबई काँक्रीटची! पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे?

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सध्या वाहतुकीचा भार वातानुकूलित शिवशाही-शिवनेरीवर आहे. यातील काही गाड्या खासगी कंत्राटदारांच्या, तर काही महामंडळाच्या मालकीच्या आहेत. संपात वाहतूक सुरू करण्यासाठी खासगी चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांकडून प्रवाशांना विनातिकीट नेण्याचे प्रकार सुरू आहेत. मुंबई-पुणे सातारा, कोल्हापूर या मार्गावर प्रवासी संख्या जास्त असूनही प्रतिफेरी उत्पन्न कमी येत असल्याने ही बाब उघडकीस आल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.

दंडात्मक कारवाईच्या सूचना

प्रवाशांना तिकीट न देता त्यांच्याकडून पैसे घेण्याच्या प्रकारामुळे एसटीच्या प्रतिमेला तडा जात असून, महामंडळाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. याला आळा घालण्यासाठी मार्ग तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहेत. याअंतर्गत दोषी चालक आणि विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई सूचना महामंडळाने राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिल्या आहेत.

पाणी पिण्याचा बहाणा देत घरात शिरले; महिलेला डांबून ठेवले अन् घडले असे काही की गाव हादरले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here