पिंपरी : ‘आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शिवसेनेकडून युवा सेनाप्रमुख व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार आहे. त्यांनी जास्तीत जास्त सभा घेण्याचे आश्वासन दिले आहे,’ अशी माहिती शिवसेनेचे राज्य संघटक गोविंद घोळवे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या समवेत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि घोळवे या वेळी उपस्थित होते. मुंबईत मोठी कारवाई, खोल समुद्रात ८०० किलो अंमली पदार्थ जप्त घोळवे म्हणाले, ‘पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत जास्तीत-जास्त नगरसेवक निवडून आणून महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडीचे संकेत दिले आहेत. त्याबाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील. भ्रष्टाचार हाच भाजपचा ध्यास आहे. या पक्षाला ‘भूलभुलैय्या पार्टी’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दोन्ही पालिकांमध्ये शिवसेनेला मोठे यश मिळेल.’
लवकरच दोन्ही महानगरपालिकेसंदर्भात ‘कोअर कमिटी’ची निवड करण्यात येणार आहे. शिवसेना आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आघाडीसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल, असे घोळवे यांनी सांगितले.