मिळालेल्या माहितीनुसार, पाली-नांदगाव मार्गावर हा अपघात झाला. दोघे तरूण दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी रस्त्यामध्ये अचानक म्हैस आडवी आली. काही कळायच्या आत दुचाकीची धडक म्हशीला लागली. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यातील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एका तरूणाला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच, वाटेत मृत्यू झाला.
नांदगाव-पाली मार्गावर एका फार्म हाऊससमोर हा भीषण अपघात घडला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमेश शांताराम पवार (वय, २४) हा दुचाकीवरून जात होता. त्याच्या पाठीमागे संतोष पवार हा बसला होता. पाली मार्गावर नांदगाव गावच्या हद्दीत एका फार्म हाऊससमोर ते आले. त्याचवेळी अचानक रस्त्यात काही म्हशी आडव्या आल्या. म्हशीला धडक लागून दुचाकीला अपघात झाला. दुचाकीसह दोघेही खाली कोसळले. या घटनेत रमेश शांताराम पवार याला गंभीर दुखापत झाली होती. अधिक प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या संतोष पवार याला उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून मुंबईला नेत असतानाच, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या अपघाताची नोंद पाली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एन. फडताडे करीत आहेत.