जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी येथे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक पत्र मिळाले. त्यात नक्षलवाद्यांनी बदला घेण्यात येईल, असा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. शिंदे ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २५ नक्षलवादी मारले गेले होते. त्यात एका कमांडरचाही समावेश होता. अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचे पत्र मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी शनिवारी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले होते की, यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळालेल्या आहेत. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या समस्येचा निपटारा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे, असेही शिंदे म्हणाले होते.
यापूर्वीही शिंदे यांना धमक्या
ठाणे आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही शिंदे यांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथक करत होते. मुंबईतील मलबार हिल येथील शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी ४ ऑक्टोबरला धमकीचे पत्र आले होते. शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. शिवाय एका कमिटीच्या नावाने हे पत्र आले होते. ‘गडचिरोलीमध्ये तुम्ही भरपूर विकासकामे करीत आहेत,’ असेही या पत्रात लिहिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. ‘बदला’ घेण्याची भाषा या पत्राद्वारे केली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या धमकीनंतर शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती.