सोलापूर-पुणे महामार्गावर मळद गावाजवळ रेल्वे उड्डाणपुलाजवळ ३० मार्चला मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास ट्रकचालक काशिनाथ कदम (वय ५५, राहणार – ढोकी, कळंब, उस्मानाबाद) यांनी रस्त्यालगत ट्रक उभा केला. ते लघुशंकेसाठी गेले असता, परत येताना पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यांच्याजवळील तीन हजारांची रोकड, ड्रायव्हिंग लायसन्स, मोबाइल, तसंच ट्रकमागे थांबवलेल्या टेम्पोमधील वाहक महंमद मेहबुब पठाण (वय ४९, राह. उस्मानाबाद) यांच्याकडील मोबाइल, चालक अल्ताफ खय्युम पटेल यांच्याकडील दोन हजार रोकड, असा एकूण सात हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला. या हल्ल्यात ट्रक चालक कदम यांचा रुग्णालयात नेत असतानाच, मृत्यू झाला. तर टेम्पोचा वाहक पठाण जखमी झाला आहे. ट्रकचा वाहक शकील शेख यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर अवघ्या ४८ तासांतच पुणे ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण विभागानं दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
गणेश अजिनाथ चव्हाण (वय २२, बोरावकेनगर, दौंड), समीर उर्फ सूरज भोसले (१९, गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड) या दोघांना गोपाळवाडी-पाटस रोड येथे सापळा रचून दोन किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीनं आणखी काही ठिकाणी लूट केल्याचं उघड झालं आहे. यातील एक आरोपी गणेश चव्हाण हा शिक्रापूर पोलिसांना हवा आहे. दरम्यान, त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना दौंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times