अहमदनगर : किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी १४ फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र सरकारने हजारे यांनी उपोषण न करण्याची विनंती केली. या पार्श्वभूमीवर आज राळेगणसिद्धी येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या ग्रामसभेत अण्णा हजारे यांनी नियोजित उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर केलं आहे. (Anna Hazare On Agitation)

सरकारने ९० दिवसांत या निर्णयावर जनतेचे मत जाणून घ्यावे आणि त्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा, असा ठराव ग्रामसभेत झाला. अण्णा हजारे यांना सभेत उपोषण न करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानुसार हजारे यांनी उद्यापासून होणारे उपोषण स्थगित केलं आहे. या वयात अण्णांनी आता उपोषण करू नये, असं भावनिक आवाहन अरुण भालेकर यांनी केलं.

Sunil Tatkare : चहाच्या पेल्यातील वादळ निघून जाईल; शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादावर खासदाराची प्रतिक्रिया

वाईन विक्रीविरोधातील आक्रमक भूमिका कायम

‘तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा नाही, असं मी सरकारला कळवलं होतं आणि त्यानंतर मग सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या. जे निर्णय घायचे ते जनतेचे मत विचारात घेऊन घ्यावेत. वाईन संबंधीचा निर्णय जनतेला विचारून घ्यायला हवा. व्यसनामुळे लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझे आयुष्य मी समाज आणि देशासाठी दिलं आहे. त्यामुळे अशा चुकीच्या निर्णयांविरुद्ध लढा देत राहणार,’ असं अण्णा हजारे यांनी ग्रामसभेत म्हटलं आहे.

‘या पुढे सरकारने आपल्या मनाने कोणतेही निर्णय घेऊन जनतेवर लादू नयेत, तसं झाले तर ग्रामसभा आंदोलन करतील. केवळ राळेगणसिद्धी नव्हे, राज्यातील सर्व गावात असे निर्णय घ्या. सरकारने यापुढे प्रत्येक ग्रामसभेला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत, असा निर्णय राळेगणसिद्धी ग्रामसभेत घेण्यात आला. तसंच पुढील तीन महिन्यात वाईनसंबंधी जनमत जाणून घ्या, लोक नको म्हणाले तर निर्णय रद्द करा,’ असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here