मुंबई: मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) ६० कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी मुंबईतील सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरून झिम्बाब्वेची नागरिक असलेल्या महिलेला अटक केली आहे. ही महिला १२ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वेहून मुंबई विमानतळावर उतरली होती. तिच्याकडील बॅगची झडती घेतली असता, ६ किलोग्रॅम हेरॉइन आणि १४८० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात ६० कोटी रुपये किंमत आहे. महिलेने अंमली पदार्थ आपल्याजवळील ट्रॉली बॅग आणि फाइल फोल्डरमध्ये लपवून आणले होते. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई सुरूच राहील. एआययू अधिकारी आणि कस्टम विभागाने संयुक्तपणे कारवाई करून झिम्बाब्वेच्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला हरारे येथून आली होती. शनिवारी ती विमानतळावर उतरली. तिने हेरॉइन आणि एमडी लपवून आणले होते. जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ६० कोटी रुपये आहे. तिने ट्रॉली बॅगमध्ये आणि दोन फाइल फोल्डरमधून ते आणले होते. आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, तिची चौकशी सुरू आहे. ही महिला केवळ अंमली पदार्थ तस्कर आहे. अंमली पदार्थ फक्त पोहोच करण्याचे काम तिचे होते. मुंबई विमानतळाबाहेर आधीपासूनच उभ्या असलेल्या व्यक्तीकडे हे अंमली पदार्थ देणार होती. मुंबई विमानतळाबाहेर पडण्यास महिलेला उशीर झाल्याने विमानतळाबाहेर उभी असलेली व्यक्ती तिथून निघून गेली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तो वितरक किंवा पुरवठादार कोण असेल, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली.