पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पुणे दौऱ्यावरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण किरीट सोमय्या हे महापालिकेत आल्यानंतर बेकायदा जमाव केल्याच्या आरोपावरून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि इतर ३०० जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Police News Update)

किरीट सोमय्या यांना काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर शिवसैनिकांच्या या कृतीला उत्तर देण्यासाठी भाजपने याच पायऱ्यांवर नुकताच सोमय्या यांचा सत्कार केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी जगदीश मुळीक यांच्यासह तब्बल ३०० जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

abg shipyard : सर्वात मोठ्या बँक घोटाळ्यावरून काँग्रेसचा हल्लाबोल, ‘बँका लुटा आणि पळा हेच…’

जगदीश मुळीक यांनी दिली प्रतिक्रिया

गुन्हे दाखल झाल्यानंतर भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने भाजप कार्यकर्त्यांवर सुडाच्या भावनेतून कारवाई केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने विविध आंदोलने केली आणि मोठा जमाव जमवून जाहीर कार्यक्रमही केले. परंतु त्यांचावर कारवाई करण्यात आली नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर महापालिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला. परंतु गुन्हेगारांवर सौम्य कलमे लावून त्यांना सोडून देण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार सर्वच क्षेत्रांत अपयशी ठरल्याने सुडाच्या भावनेतून कारवाई करत आहे. पुणे पोलीस सरकारच्या दबावाखाली आहे. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी भाजप कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. सरकारचा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार सातत्याने जनतेसमोर आणू आणि पुणेकर जनता या सरकारला नक्की धडा शिकवेल,’ असं जगदीश मुळीक यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here