मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील जितेंद्र जाधव हा पत्नी पुजा आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. चाळीसगाव येथील जे.जे. आण्णा टावर या मक्तेदाराकडे जेसीबी चालक म्हणून तो काम करत होता. जितेंद्र जाधव आणि त्यांची पत्नी पुजा जाधव यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होता. दरम्यान जितेंद्रसोबतच्या वादामुळे पुजाने तिचा भाऊ भूषण, काका सुधाकर व काकू यांना चाळीसगाव येथे बोलावून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जितेंद्र याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनतर पुजा ही माहेरी निघून गेली, तर जितेंद्र हा दोन मुलांना सोबत घेऊन बोरखेडा येथे आपल्या मूळ गावी आला होता.
दरम्यान, रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास जितेंद्रने चिराग व खुशी दोन्ही मुलांना सोबत घेतले व गावाबाहेर पडला.
दोन्ही मुलांना पाववडे खायला घातले आणि…
बोरखेडा येथील बसस्थानकावरील हॉटेलवर जितेंद्र याने आपल्या दोन्ही मुलांना पाववडे खाऊ घातले. त्यानंतर तिघेही दिसेनासे झाल्याने जितेंद्र याचा भाऊ व वडिलांना शंका आल्याने त्यांनी मुलांचा व जितेंद्र याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्यांनी कजगाव, वाघळीपर्यंत रेल्वेरुळ पिंजून काढल्यानंतर ते आढळून आले नाहीत, तर नगरदेवळा रेल्वेस्थानकाजवळ त्यांचे नातेवाईक नाना अहिरे हे शोध घेत असतानाच त्यांच्या नजरेस जितेंद्र, चिराग व खुशी हे मृत अवस्थेत आढळून आले.