म. टा. प्रतिनिधी, पुणेः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केली आहे. पक्षाने तयारीच्या आढाव्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाची ताकद असलेल्या ४० प्रभागांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. भारतीय जनता पक्षासोबतच्या युतीबाबत अद्याप निर्णय झालेला नसल्याने सध्या ‘एकला चलो रे’ पद्धतीने पक्षाने तयारी सुरू केली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या शहर कार्यकारिणीची बैठक शनिवारी आयोजिण्यात आली होती. पक्षाचे नेते अनिल शिदोरे, शहराध्यक्ष वसंत मोरे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, नेते राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर, अॅड. किशोर शिंदे, हेमंत संभूस, बाळा शेडगे, योगेश खैरे, वनिता वागस्कर आदी उपस्थित होते. पक्षाच्या शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अंजनेय साठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्या जागी रणजित शिरोळे यांची निवड करण्यात आली आहे.

‘मिशन २०२२’अंतर्गत निवडणुकीची तयारी हाच या बैठकीचा विषय होता. त्यामध्ये सर्व कार्यकारिणी सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. भारतीय जनता पक्षासोबत युतीबद्दलचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरेच घेतील. तोपर्यंत पक्षाच्या वतीने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्याविषयीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला,’ असे मोरे यांनी सांगितले.

‘पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून, आम्ही सर्व जागा लढविणार आहोत. २०१७च्या निवडणुकीत पक्षाने लढवलेल्या ११६पैकी ३७ जागांवर पक्षाला चांगली मते मिळाली होती. दोन नगरसेवक निवडून आले होते. पक्षातील आजी-माजी मिळून १९ नगरसेवक आजही सक्रिय आहेत. त्यामुळे या जागांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल,’ असे मोरे यांनी स्पष्ट केले.

निरीक्षकांची नेमणूक

‘पक्षातर्फे विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी दोन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक पक्षाचे वातावरण, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे काम याची पडताळणी करतील व त्यानुसार मानांकन देतील. त्याआधारे पुढील निर्णय घेण्यात येतील,’ असे ‘मनसे’चे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here