ताज हॉटेलमधील हा वेटर भाजीच्या ट्रकमध्ये बसून मुंबईहून गावाकडे आल्याची माहिती मिळाली आहे. येणेगूर (ता. उमरगा) येथून दूधाच्या टेम्पोमध्ये बसून तो धानोरीमध्ये आला. या प्रवासात तो किती लोकांच्या संपर्कात आला, त्यांचा शोध सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुंबईत तपासणी झाल्यावर त्याला कसे सोडण्यात आले, याबाबतही प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात गुरुवारी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. बलसूर (ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) येथील एका ३० वर्षीय युवकास करोनाची लागण झाल्याचे गुरुवारी सायंकाळी निष्पन्न झाले होते. हा युवक काही दिवसांपूर्वी पानिपत येथे फिरण्यासाठी गेला होता. दोन दिवसांपूर्वी तो गावात परतला. बुधवारी एक एप्रिल रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्यानंतर त्याला दाखल करुन घेण्यात आले होते आणि स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविला होता. त्याचा अहवाल गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. त्यातून या युवकाला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. खबरदारी म्हणून त्याच्या पत्नीचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविला होता. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. युवकावर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन दिवसांपासून तो गावात व अन्य ठिकाणी कुणाकुणाच्या संपर्कात आला याचा शोध घेण्यासाठी आता यंत्रणा सतर्क झाली आहे. या रुग्णामुळे आधीच चिंतेचे वातावरण असताना जिल्ह्यात आणखी एक रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times