भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोविडच्या काळात बांधलेले रत्नागिरी येथील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर रिसॉर्टच्या पाठपुरवठ्यासाठी आज सोमवारी सकाळी भाजप नेते किरीट सोमय्या हे रत्नागिरीला रवाना झाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांना वाचवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी, ते वाचवू शकत नसल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. हे बांधलेले रिसॉर्ट बेकायदेशीर आहे, कोविडच्या काळात रिसॉर्ट बांधले आणि सचिन वाझे यांच्या खंडणीच्या पैशांतून ते रिसॉर्ट बांधले असल्याचा आरोप देखील यावेळी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर केला आहे. केंद्र सरकारने व महाराष्ट्र कॉन्स्टिट्युशन अथॉरिटीने देखील या रिसॉर्टला बेकायदेशीर ठरवले असून, या संपत्तीवर कायदेशीर कारवाई सुरू होणार आहे, त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी रत्नागिरीला जात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
दापोली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कायदेशीर कारवाईची अंमलबजावणी करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी रत्नागिरी येथे जाऊन करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. रत्नागिरी येथे काही लोक आणखी एका मंत्र्यांच्या घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराची कागदपत्रे देणार असल्याचे सांगत काही मंत्र्यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे मला मिळणार असून आणखी घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.