केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शह देण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित आले आहेत. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक होत असून, राणे यांना पुन्हा धक्का देण्यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांची ओळख परेड केली. दुसरीकडे कुडाळ शहरात काँग्रेसमय वातावरण करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा काँग्रेसने पक्षाचे झेंडे लावले असून, जोरदार वातावरण निर्मिती केली जात आहे. कुडाळ नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या ९ नगरसेवकांनी आज, कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी भेट घेतली. महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार आफ्रिन करोल यांच्या विजयासाठी कणकवली येथून कुडाळकडे रवाना झाले.
कुडाळमध्ये कार्यकर्ते आमनेसामने
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. कुडाळ नगराध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आज नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक कुडाळ नगरपंचायत येथील इमारतीच्या जवळ आले. त्याचवेळी शिवसेना, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, यामुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्गात शिवसेना आणि भाजप असा संघर्ष पाहायला मिळाला.
कुडाळ नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसकडे
सिंधुदुर्गातील कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सहजपणे सरशी होणार असे वाटत असतानाच, अवघ्या एका जागेने ही नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसच्या ताब्यात गेली. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. शिवसेनेला सात आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला. आज नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होत असून, ती भाजप आणि काँग्रेस-शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची झाली आहे.