मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येईल, अशा गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत, शिवछत्रपतींच्या जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण अनुभवावेत, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले आहे.

येत्या शनिवारी (ता. १९) छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे. त्या अनुषंगाने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवज्योत आणि जन्मोत्सव सोहळ्यातील उपस्थितीबाबत विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी ही मान्यता दिली आहे. तसे निर्देशही गृह विभागासह संबंधित यंत्रणांना देण्यात येत आहेत. शिवजयंती उत्सवासाठी विविध शीव प्रेरणास्थळांवरून शिवज्योती आणण्यात येतात. त्यासाठी या शिवज्योत दौडीत २०० जणांना सहभागी होता येईल. तसेच शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाचशे जण उपस्थितीत राहू शकणार आहेत.

Maratha reservation: मराठा आरक्षणावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक, मुंबईत मोठी घोषणा
शिवजयंतीला करा पुतळ्याचे लोकार्पण

करोना महामारीमुळे गेली दोन वर्षे देशभरासह महाराष्ट्रात शिवजयंती सोहळा धुमधडाक्यात साजरा करता आलेला नाही. अगदी साधेपणाने या दोन वर्षांत शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. करोनामुळे धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर काही ना काहीतरी निर्बंध लादले जात होते. त्यामुळे सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. राज्यात करोनाचा प्रादूर्भाव हळूहळू कमी होत आहे. राज्यातील करोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा निर्बंध शिथील करून शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा करता येईल अशी हजारो शिवप्रेमींची अपेक्षा होती. तसेच शिवजंयती सोहळ्याला निर्बंध शिथील करण्यात यावेत, अशी मागणीही केली जात होती. शिवज्योत आणि शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थितीसंदर्भात विशेष बाब म्हणून अनुमती देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली असून, शिवज्योती दौडमध्ये २०० जण, तर शिवजन्मोत्सव सोहळ्यात ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होईल, असे शिवप्रेमींकडून सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here