शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिनसैनिक हिंदूहृदयसम्राट म्हणून संबोधतात. आता मनसेनेही हिंदुत्त्वाचा मुद्दा हाती घेतला असून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताचे भलेमोठे बॅनर मनसेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपर, चेंबूर परिसरात लावले आहेत. यात राज ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना, आता मनसेने हिंदुत्वचा मुद्दा हाती घेतलाच होता, त्यातच थेट राज ठाकरे हे हिंदुहृदयसम्राट असल्याचा उल्लेख केलेले बॅनर झळकल्याने त्याची जोरदार चर्चा मुंबईत सुरू आहे.
बॅनरवर अमित ठाकरेही झळकले
मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष मोठ्या ताकदीने उतरणार आहेत. मनसे स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुंबईत जबरदस्त यश मिळालेल्या मनसेला त्यानंतरच्या काळात मात्र, अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. आता यंदाच्या निवडणुकीत मनसेही पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे समजते. घाटकोपरमध्ये मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होत आहे. त्यांच्या स्वागताची तयारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. घाटकोपर, चेंबूर परिसरात त्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले आहेत. हे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. कारण या बॅनरवर राज ठाकरे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या बॅनरवर अमित ठाकरे यांचेही फोटो झळकत आहेत.