मालवणी येथे राहाणाऱ्या एका ६५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याने त्याला जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्राॅमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला किडनीचाही आजार होता. बुधवारी रात्री या व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह गुरुवारी पहाटे चार वाजता मालाड मालवणी येथील कब्रस्तानात अंत्यसंस्कारासाठी नेला. मात्र कब्रस्तानच्या विश्वस्तांनी रुग्णाचे ज्या रुग्णालयात निधन झाले, त्या परिसरातील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करावे, असा महापालिकेचा करोनामुळे झालेल्या मृतदेहाबाबत अंत्यसंस्काराचा नियम असल्याचे स्पष्ट करत कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला.
या वादात अखेर पोलीस आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दफन करू देण्याची विनंती विश्वस्तांकडे केली. मात्र तरीही विश्वस्तांनी ऐकले नाही, असा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केला आहे. त्यानंतर काही सामाजिक संस्थांनी पुढे येऊन बोरीवली पूर्व येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी पालिकेकडे मागितली. त्यानंतर या रुग्णावर आज सकाळी दहा वाजता दहन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरकारचे चौकशीचे आदेश
याबाबत मालवणीचे आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडे विचारणा केली असता, सरकारच्या नियमावलीनुसार ‘करोनामुळे ज्या रुग्णालयात निधन झाले, त्या परिसरातील कब्रस्तानात अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यानुसार जोगेश्वरी परिसरातील कब्रस्तानात अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते. मात्र मालवणी येथील कब्रस्तानात मृतदेह कसा पाठवण्यात आला, या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत, असे शेख यांनी स्पष्ट केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times