अहमदनगर :शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेवासा मतदारसंघात विविध विकास कामांचे लोकार्पण गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. शनिशिंगणापूर येथे शनी देवाचे दर्शन घेतल्यानंतर पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. (Gulabrao Patil Criticises Bjp)

‘भाजपचे किरीट सोमय्या दररोज भ्रष्टाचाराचे नवनवीन आरोप करत शिवसेनेसह महाविकास आघाडीला लक्ष्य करत आहेत. भ्रष्टाचार काढण्यासाठी कोणाला प्रमाणपत्र दिलेलं नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ईडीचा वापर सुरू आहे. यामुळे राजकारणाची दिशा बदलत चालली असून भाजपमध्ये सगळे मंडलेश्वर आहेत का?’ असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी किरीट सोमय्या यांचा समाचार घेतला.

Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट; मुंबई परिसरात झळकले भलेमोठे बॅनर

भाजपला इशारा

कॉंग्रेसमुळे देशात करोना पसरला असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आणि राज्यभरात भाजपविरोधात आंदोलन करण्यात आलं. काही ठिकाणी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या आंदोलनाचे समर्थन करत गुलाबराव पाटील म्हणाले की, जर कोणी शिवसेना म्हणून माझ्या पक्षावर टीका करत असेल तर मी बांगडी घालून बसलेलो नाही. भाजप काँग्रेसबद्दल बोलली आहे तर त्यांच्या अस्मितेसाठी ते आंदोलन करणारच, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

‘पंतप्रधान मोदींचं वक्तव्य चुकीचं’

देशाच्या पंतप्रधानांनी संसदेत असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. विषाणू कोणी खिशात आणला नाही, त्यामुळे आशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही. सर्व्हेमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाचं कौतुक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे. कोणत्याही राज्याच्या बाबतीत असं बोलणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here