राज्यात आढळलेल्या ‘करोना’च्या ३२२ ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांपैकी २२६, म्हणजे ८५ टक्के रुग्ण हे कोणत्या तरी ‘पॉझिटिव्ह’ रुग्णाच्या संपर्कात आल्याने बाधित झाले आहेत. या पॉझिटिव्ह रुग्णांची चाचणी करताना त्यांना सर्दी, ताप, खोकल्यासारखी कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र, ते ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
वैद्यकीय शिक्षण खात्याने राज्यातील ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे विश्लेषण केले आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. बाधितांपैकी चार टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे. परदेशातून आलेले बाधित रुग्ण, त्यांच्या संपर्कात आल्याने करोनाग्रस्त झालेले रुग्ण, चाचण्या केलेल्यांपैकी पॉझिटिव्ह-निगेटिव्ह रुग्ण; तसेच देश आणि महाराष्ट्रात ‘करोना’ची कधीपासून लागण झाली आणि त्याचे प्रमाण कसे बदलले, याचा सविस्तर अहवाल वैद्यकीय शिक्षण खात्याने तयार केला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्याच्या आरोग्य खात्याच्या आकडेवारींचा आधार घेण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत ३३५ रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १३ रुग्णांचा पुणे, मुंबईसह काही शहरांमध्ये मृत्यू झाला. उर्वरित ३२२ पैकी ४५ जण बरे झाले असून, २६५ जण पुणे, मुंबई, नागपूर, सांगलीसह अन्य शहरांतील सरकारी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसली नव्हती. ते केवळ बाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांची चाचणी केली गेली आणि त्यात ते ‘पॉझिटिव्ह’ आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी अवघ्या ३० बाधितांमध्ये सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून आली. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ११ टक्के, तर गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रमाण चार टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशात एक एप्रिल रोजी १८६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे ३३५ रुग्णांची नोंद महाराष्ट्रात आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेशात १०३, केरळमध्ये २४१, तर कर्नाटकात १०१ रुग्ण आढळले. तमिळनाडूत २३४, राजस्थानात ९३, तर आंध्र प्रदेशात ८३ रुग्ण आढळले. राज्यातील ३२२ रुग्णांपैकी ८३, म्हणजे २६ टक्के रुग्ण प्रवासी होते. त्यांच्या संपर्कात आल्याने १४७ जणांना (४५ टक्के) लागण झाली, तर ६४ जणांच्या (२० टक्के) चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. राज्यात आजमितीला ६,४१४ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ९५ टक्के चाचण्या ‘निगेटिव्ह’ आल्या आणि फक्त पाच टक्के रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times