संजय राऊत यांनी सोमवारी यासंदर्भात सूचक इशारा दिला होता. आतापर्यंत आम्ही खूप सहन केलं, आता आम्ही आरोप करणाऱ्यांना उद्ध्वस्त करु. राज्यात आमचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्त्व शिवसेनेकडे आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावं. भाजपचे नेते आम्हाला धमक्या देतात काय? हमाम मे सब नंगे होते है. मी काय बोलतोय, हे भाजप नेत्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. आता त्यांनी जे उखाडायचं आहे, ते उखाडा, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते.
संजय राऊत ‘ईडी‘ला टार्गेट करणार?
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत आहेत. मात्र, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील पत्रकारपरिषदेत ‘ईडी’वर आगपाखड केली होती. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी काहीजणांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, मी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्याने ‘ईडी’च्या माध्यमातून मला लक्ष्य केले जात आहे. ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्रास देत आहेत. माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते. हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारपरिषद घेईन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता सर्वांनाच संजय राऊत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.