बीड न्यूज बातम्या: घरासमोर बोलावून बाप लेकावर तलवार अन् कुऱ्हाडीने हल्ला, VIDEO पाहून हादराल – beed video father and son attacked with sword and ax cctv video
बीड : शुल्लक कारणावरून शस्त्रधारी गाव गुंडाकडून घरासमोर बोलावून तलवार आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या कर्झनी गावातील ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. या मारहाणीत २ जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे तर नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
दिवसाढवळ्या अशा पद्धतीने तलवार आणि काठ्या कुऱ्हाडीने मारहाण होत असेल तर कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीड तालुक्यातील कर्झनी गावातील कल्याण सपकाळ यांना सकाळी ९ च्या दरम्यान घराबाहेर बोलावून अचानक काठीने मारहाण करायला सुरुवात केली. वडिलांना मारहाण होते हे पाहून मुलगा धावत आला तर त्याच्यावरदेखील तलवार आणि चाकूने मारहाण केली.
तलवार, कुऱ्हाड, चाकूचा वापर झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आम्हाला न्याय द्या अशी मागणी पीडितांकडून करण्यात आली आहे.
इतकंच नाहीतर मारहाण केल्यानंतर पुन्हा रात्री घरासमोर जाऊन जीवे मारण्याची धमकी दिल्यानं सपकाळ कुटुंब दहशतीखाली आहे. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना विचारले असता तपास सुरू असल्याची माहिती मिळाली.