मुंबई :शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवन येथील बहुचर्चित पत्रकार परिषद अखेर पार पडली आहे. यावेळी राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर दिलं आणि भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर सणसणाटी आरोपही केले आहेत. (Sanjay Raut On Devendra Fadanvis)

संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येतील आणि त्यांच्या जागी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जातील, असा दावा केला होता. त्यामुळे राऊत आज कोणत्या नेत्यांवर आरोप करणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली होती. तुम्ही उल्लेख केलेल्या साडेतीन नेत्यांपैकी अर्धा नेता कोण? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, ‘साडेतीन नेत्यांपैकी अर्धा कोण हे उद्यापासून तुम्हाला कळणार… काही अर्धे आहेत, काही पाव आहेत. आम्ही जेवढं आतमध्ये जाऊ तेवढ्या गोष्टी बाहेर येतील,’ असा दावा राऊत यांनी केला.

Sanjay Raut: संजय राऊत ‘त्या’ रात्री अमित शाह यांना फोन करुन म्हणाले…

‘मोहीत कंबोज फडणवीसांना बुडवणार’

फडणवीस सरकारच्या काळात इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. तसंच मोहीत कंबोज हा फडणवीसांचा लाडका व्यक्तीच त्यांना बुडवणार आहे, असं ते म्हणाले.

सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा

ईडीसह इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून जाणीवपूर्वक आम्हाला त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. ‘माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ईडीवाले चौकशी करण्यासाठी मेहेंदीवाल्यांकडे गेले, मी जेथून कपडे शिवले त्या व्यक्तीकडे गेले. फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन वनमंत्र्याने आपल्या मुलीचं लग्न मुंबईत केलं होतं. वनमंत्री असल्याने जंगलाचा सेट या लग्नासाठी उभारण्यात आला होता. जंगलाचा फील येण्यासाठी या लग्नात जे कार्पेट टाकण्यात आले होते त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती,’ असा दावा करत संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here