कोल्हापूर : ‘मागील काही दिवसांपासून रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. या प्रश्नावर महाविकास आघाडी आणि केंद्रात असलेल्या भाजपला खतदर वाढीसंदर्भात निर्णय घ्यावा लागेल, अन्यथा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मत मागायला आला तर शेतकरी उसाचे बुडखे घेऊन तयार आहेत,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. (Raju Shetti Farmers Protest)

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर हल्लाबोल करत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. मोर्चात जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

‘राज ठाकरे यांना फक्त ‘मराठी हृदयसम्राट’ हीच उपाधी लावा’; मनसेचा कार्यकर्त्यांना आदेश

‘…तर आंदोलन छेडावे लागेल’

दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत आज मंगळवारी दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरुवात झाली. शेतकऱ्याला उसाला एफआरपीसह २०० रुपयांचा जास्त हप्ता मिळावा, सदोष वीज बिलांची दुरुस्ती व्हावी, शेतकऱ्याला दिवसा १० तास वीज मिळावी, खत आणि पशुखाद्याची दरवाढ मागे घ्या, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेले ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावं, अशा मागण्या शेट्टी यांनी केल्या. ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान न दिल्यास नव्याने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. भूमीग्रहन कायद्यातील दुरुस्ती रद्द करावी, अशी मागणीही यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रा. दीपक पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here