Mahavikas Aghadi Govt Thackeray Govt Cabinet Shuffle May Happen After 10th March 2022 Says Nana Patole | ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, १० मार्चनंतरचा मुहूर्त?
मुंबई: नेत्यांवर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप, मंत्र्यांची तुरुंगवारी आणि सत्तापालटाची टांगती तलवार असलेल्या महाविकासआघाडी सरकारकडून लवकरच निर्णायक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे. महाविकासआघाडी सरकारकडून पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल केले जाऊ शकतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेत दिले आहेत. नाना पटोले नुकतेच दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडला भेटले होते. एका कार्यक्रमात बोलताना नाना पटोले यांनी म्हटले की, १० मार्चनंतर सरकार दुरूस्त होणार. माझी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. लवकरच राज्य सरकारमध्ये बदल दिसतील. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर हे बदल होतील. सध्या राज्यात जे काही सगळं सुरु आहे, ते लवकरच दुरुस्त करायचे आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट कधी होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. येत्या १० मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील जवळपास १३ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा होणार आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळात बदल केले जाणार का, हे पाहावे लागेल.
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले होते. १० मार्चनंतर महाविकासआघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटले होते.